पीएम विद्यालक्ष्मी योजना काय आहे? मिळते 10 लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या..

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana in Marathi

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana in Marathi: देशात शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवत आहेत. देशातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सरकारकडून ठेवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पीएम विद्या लक्ष्मी योजना (PM Vidya Lakshmi Yojana) सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत उच्चस्तरीय शिक्षण संस्थांमध्ये (QHEIs) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज दिले जाते. देशात असे अनेक विद्यार्थी आहेत जे त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांना सरकारमार्फत १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के अनुदान दिले जाते.

पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेची माहिती

योजनापंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना
फायदेगुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण शुल्क आणि इतर अभ्यासक्रमांशी संबंधित खर्च भागविण्यासाठी तारणमुक्त, हमीमुक्त कर्ज उपलब्ध करून देणे.
पात्र विद्यार्थीदर्जेदार उच्च शिक्षण संस्था (QHEIs) आणि (HEIs) मध्ये प्रवेश घेतलेला कोणताही विद्यार्थी यासाठी पात्र आहे.
समाविष्ट संस्थाNIRF क्रमवारीत QHEI, उच्च शिक्षण संस्था पहिल्या १०० मध्ये आहेत आणि NIRF क्रमवारीत राज्य सरकारी उच्च शिक्षण संस्था १०१-२०० व्या क्रमांकावर आहेत.
व्याज अनुदान८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ३% व्याज सवलत दिली जाते.
क्रेडिट गॅरंटी७.५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेसाठी थकबाकी असलेल्या डिफॉल्ट रकमेच्या ७५% ची क्रेडिट गॅरंटी दिली जाते.
अर्ज प्रक्रियापीएम विद्यालक्ष्मी योजनेच्या अधिकृत पोर्टलद्वारे.

पीएम विद्यालक्ष्मी योजनेचा उद्देश:

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कर्ज मिळविण्यात मदत करणे आहे. ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना विविध बँकांकडून शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देते.

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहेत.

  • आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना सहज शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणे.
  • शैक्षणिक कर्जासाठी पारदर्शक पद्धतीने अर्ज प्रक्रिया राबविणे.
  • आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्राधान्य देणे.
  • विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जावरील व्याजदरात अनुदान देणे.
  • विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 75 टक्के क्रेडिट हमी देणे.
  • भारतातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कर्ज पुरवठा करणे.

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेची पात्रता काय आहे?

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेची पात्रता खालीलप्रमाणे आहे:

  1. अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  2. विद्यार्थ्याने भारतात किंवा परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवलेला असावा.
  3. व्यावसायिक, तांत्रिक (उदा., अभियांत्रिकी, वैद्यकीय), स्नातक, स्नातकोत्तर, पीएच.डी., किंवा इतर मान्यताप्राप्त अभ्यासक्रम.
  4. दरवर्षी नवीनतम NIRF रँकिंग वापरून QHEI ची यादी अपडेट केली जाते. ८६० पात्र QHEI मध्ये प्रवेश मिळवणारे २२ लाखांहून अधिक विद्यार्थी पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतील.
  5. ज्या विद्यार्थ्यांना केंद्र/राज्य सरकारच्या इतर शिष्यवृत्ती, व्याज अनुदान किंवा शुल्क परतफेड मिळते ते पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  6. अर्जासोबत पालक, पती/पत्नी किंवा कायदेशीर पालक यांपैकी एक सह-अर्जदार असणे आवश्यक आहे.
  7. साधारणतः ७.५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेसाठी बँका हमी किंवा तृतीय-पक्षाची जामीनगिरी मागू शकतात. त्यापेक्षा लहान रकमेसाठी हमीची आवश्यकता नाही.
  8. अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षांदरम्यान असावे (संबंधीत बँकेच्या धोरणानुसार बदल होऊ शकतो).
  9. अर्जदार किंवा सह-अर्जदार यांच्याकडे इतर कर्जाची थकीत बाकी नसावी.

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेचा अर्ज कसा करावा?

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेचा अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांना विद्यालक्ष्मी पोर्टलवर एक नवीन वापरकर्ता प्रोफाइल तयार करणे आवश्यक आहे. पोर्टलवर नवीन प्रोफाइल तयार कशी करायची याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.

  • विद्यालक्ष्मी पोर्टलची अधिकृत वेबसाइट https://www.vidyalakshmi.co.in/ ला भेट द्या.
  • “NEW USER? REGISTER NOW” पर्याय दिलेला असेल.
  • नाव, ईमेल, फोन नंबर इत्यादी वैयक्तिक माहिती भरून नवीन खाते तयार करा.
  • तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर तुम्हाला एक पडताळणी लिंक मिळेल. तुमचे खाते पडताळण्यासाठी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा.
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Apply online
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Apply online

टीप: विद्यार्थ्यांनी विद्या लक्ष्मी पोर्टलवर तुम्ही सबमिट केलेल्या माहितीची उलटतपासणी नक्की करावी, कारण सबमिट केल्यानंतर तुम्ही ते बदलू शकत नाही.

नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करण्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर, पुढचा टप्पा म्हणजे विद्या लक्ष्मी शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करणे. पोर्टलवर तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून खाते ओपन करा.

  • “शोधा आणि कर्जासाठी अर्ज करा” हा पर्याय निवडा.
  • आता, तुम्हाला जिथे शिक्षण घ्यायचे आहे तो देश निवडा (भारत/परदेशात)
  • तुम्हाला जो कोर्स करायचा आहे तो निवडा.
  • तुमच्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेली रक्कम निवडा.
  • विद्या लक्ष्मी शैक्षणिक कर्जाचा अर्ज करण्यासाठी तुमच्या पसंतीच्या 3 बँका निवडा.
  • मागितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • तुम्ही जो तपशील सबमिट करणार आहात तो पुन्हा एकदा तपासून घ्या.
  • वर दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतर, “SUBMIT” पर्यायावर क्लिक करा.

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेचे आवश्यक कागदपत्रे कोणते?

पीएम विद्यालक्ष्मी योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत.
  • आधार कार्ड
  • बँक खात्याचा तपशील
  • उच्च शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घ्यातल्याचा पुरावा
  • 10+2 ची मार्कशीट
  • जन्म प्रमाणपत्र:
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा पुरावा (ITR/ फॉर्म १६/ पगार स्लिप इ.)
  • वैध व्हिसा, शैक्षणिक व्हिसा (परदेशात शिक्षण घेणाऱ्यांसाठी)
  • महाविद्यालयाचे प्रवेशाचे पत्र आणि संबंधीत अभ्यासक्रमाची फी
  • विद्यार्थ्यांचे पालकत्व प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

पीएम विद्यालक्ष्मी योजनेचे व्याजदर आणि सबसिडी

शैक्षणिक कर्ज देणारी बँक किंवा वित्तीय संस्था आणि QHEI किंवा HEI द्वारे आकारण्यात येणारे अभ्यासक्रम शुल्क यावर व्याजदरात बदल होतो. सध्या, काही नामांकित बँकांचे १० लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जासाठीचे व्याजदर 8.1% ते 18% पर्यंत आहेत.

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना अंतर्गत उच्च शिक्षणासाठी कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्याजदर हे संबंधित बँकेच्या नियमावर अवलंबून आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी अर्ज करतेवेळी निवड केलेल्या बँकेच्या व्याज दरानुसार ते अकरले जाते. या योजनेत, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत आहे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जावर 3 टक्के व्याज सवलत दिली जाते.

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेतील सहभागी बँका

पीएम विद्यालक्ष्मी पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या योजनेत ३८ बँका नोंदणीकृत आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

  1. अभ्युदय सहकारी बँक लिमिटेड
  2. आंध्र प्रगती ग्रामीण बँक
  3. अ‍ॅक्सिस बँक
  4. आयडीएफसी फर्स्ट बँक
  5. इंडियन बँक
  6. इंडियन ओव्हरसीज बँक
  7. जम्मू आणि काश्मीर बँक लिमिटेड
  8. छत्तीसगड राज्य ग्रामीण बँक
  9. सिटी युनियन बँक लिमिटेड
  10. डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड
  11. फेडरल बँक
  12. जीपी पारसिक बँक लिमिटेड
  13. एचडीएफसी बँक
  14. आयसीआयसीआय बँक
  15. करूर वैश्य बँक
  16. केरळ ग्रामीण बँक
  17. कोटक महिंद्रा बँक
  18. न्यू इंडियन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
  19. बँक ऑफ बडोदा
  20. बँक ऑफ इंडिया
  21. आयडीबीआय बँक
  22. बँक ऑफ महाराष्ट्र
  23. कॅनरा बँक
  24. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  25. कर्नाटक बँक लिमिटेड
  26. कर्नाटक ग्रामीण बँक
  27. कर्नाटक विकास ग्रामीण बँक
  28. राजस्थान मरुधारा ग्रामीण बँक
  29. आरबीएल बँक लिमिटेड
  30. स्टेट बँक ऑफ इंडिया
  31. तमिळनाड मर्कंटाइल बँक लिमिटेड
  32. पंजाब अँड सिंध बँक
  33. युको बँक
  34. युनियन बँक ऑफ इंडिया
  35. येस बँक
  36. पंजाब नॅशनल बँक
  37. कालूपूर कमर्शियल को-ऑप बँक लिमिटेड
  38. द साउथ इंडियन बँक लिमिटेड

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेच्या शैक्षणिक कर्जाची परतफेड कशी करायची?

कर्जाची परतफेड जास्तीत जास्त १८० समान मासिक हप्त्यांमध्ये (EMIs) म्हणजेच अधिस्थगन कालावधी वगळून जास्तीत जास्त १५ वर्षे असेल.

  • कर्ज घेतल्यानंतर किंवा पदवी/डिप्लोमा पूर्ण झाल्यावर, निश्चित केलेल्या कालावधीत परतफेड सुरू होते.
  • कर्ज हप्त्यांमध्ये परत करायचे असते, ज्यात कर्जाची रक्कम आणि व्याजाचा समावेश असतो.
  • कर्जावर व्याज आकारले जाते, जे बँकांच्या नियमांनुसार ठरते.
  • ७.५ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी, थकबाकी चुकतेवर ७५% क्रेडिट हमी असते, ज्यामुळे बँकांना कर्ज मंजूर करणे सोपे होते.

पीएम विद्यालक्ष्मी योजनेचे फायदे कोणते?

  • पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील फायदे मिळतात.
  • एकाच प्लॅटफॉर्म वरून विद्यार्थी अनेक बँकांच्या शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकतात.
  • विद्यालक्ष्मी पोर्टल वरून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना बँकेच्या शाखांमध्ये प्रत्यक्ष भेट देण्याची गरज नाही.
  • विद्यार्थी सिंगल विंडो पोर्टलचा वापर करून कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात.
  • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी या पोर्टल वरून एकाच वेळी ३ वेगवेगळ्या बँकांमध्ये अर्ज करू शकतात.
  • विद्यालक्ष्मी पोर्टल वरून अर्ज केला असता विद्यार्थ्यांना अतिरिक्त प्रोसेसिंग फी आणि इतर छुपे शुल्क लागत नाही.
  • हे पोर्टल भारतात तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरते.
  • विद्यालक्ष्मी पोर्टलवर ८९ प्रकारचे वेगेवगळे शैक्षणिक कर्ज देणाऱ्या ३८ नोंदणीकृत बँका आहेत.

पीएम विद्यालक्ष्मी योजनेची व्याज सवलत

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेत, ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ८ लाखांपर्यंत आहे, त्यांना १० लाखांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जावर ३% व्याज सवलत मिळते, जी करपात्र नाही.

वार्षिक उत्पन्नतांत्रिक/व्यावसायिक अभ्यासक्रमइतर अभ्यासक्रम
वार्षिक उत्पन्न ४.५ लाख रुपयांपर्यंत१००% व्याज सवलत

(PM-USP CSIS)

३% व्याज सवलत

(पंतप्रधान-विद्यालक्ष्मी)

वार्षिक उत्पन्न ४.५ लाख ते ८ लाख रुपये

 

३% व्याज सवलत

(पंतप्रधान-विद्यालक्ष्मी)

३% व्याज सवलत

(पंतप्रधान-विद्यालक्ष्मी)